History, Origin and Meaning of Black Forest Cake: 'ब्लॅक फॉरेस्ट' केक हे जगप्रसिद्ध जर्मन डेझर्ट असून, तेथील 'ब्लॅक फॉरेस्ट' या पर्वतराशींवरून या केकला 'ब्लॅक फॉरेस्ट' हे नाव मिळाले आहे. या डेझर्टमध्ये मऊ व स्पॉजी चॉकलेट केकचे एकावर एक थर लावून त्या प्रत्येक थरामध्ये फेटलेली क्रीम व चेरीज घातल्या जातात. वरच्या थरावर पांढरी शुभ्र क्रीम पसरून त्यावर किसलेली चॉकलेट्स व लालचुटूक चेरी यांनी सजावट केली जाते.
या केकमध्ये वापरलेल्या तीनही पदार्थांच्या मागे प्रतीकात्मक असा अर्थ आहे. गडद तपकिरी चॉकलेट हे घनदाट ब्लॅक फॉरेस्टचे प्रतीक, पांढरे क्रीम हे बर्फाच्छादित शिखरांचे प्रतीक व लाल चेरीज या डोंगरांमध्ये उमलणारी फळे आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. हा केक म्हणजे जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्ट भागाचे खाद्य-प्रतिरूपच आहे. ब्लॅक फॉरेस्ट आणि चेरीज यांचे नाते अतिशय घट्ट आणि गोड असे आहे. या भागात चेरीज भरपूर प्रमाणात मिळत असल्यामुळे स्थानिक लोकांनी त्यांचा केकमध्ये सुंदर वापर केला आहे. ताज्या ताज्या लालचुटूक चेरीज आणि चेरीपासून तयार केलेल्या ब्रँडीने ब्लॅक फॉरेस्ट केकला खास चव दिली आहे.
चेरी म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट केकमधला एक महत्त्वाचा घटक असून त्यामुळे केकची रंगत वाढते. केकमध्ये ताज्या, साखरेच्या पाकात मुरवलेल्या किंवा चेरीच्या ब्रँडीमध्ये मुरवलेल्या चेरीज वापरल्या जातात. मूळ जर्मन परंपरेनुसार या केकमध्ये किर्शवॉसर (Kirschwasser) नावाचे चेरीपासून तयार केलेला हलके मद्य वापरले जाते. त्यामुळे ब्लॅक फॉरेस्ट केकला एक वेगळी चव आणि स्वाद मिळतो. आज अनेक ठिकाणी केकमध्ये अल्कोहोल न वापरता ताज्या चेरीज किंवा चेरी सिरप घातले जाते.
किर्शवॉसर ही एक पारंपरिक जर्मन चेरी ब्रँडी असून, ती ताज्या आंबटसर चेरीज आंबवून, बनवली जाते. ती केकच्या थरांवर शिंपडली असता केक ओलसर होऊन त्याला चेरीचा सुगंध मिळतो. कही वेळा ही ब्रँडी क्रीममध्ये मिसळली जाते, तर
केकमध्ये घालायच्या चेरीज त्या ब्रँडीमध्ये मरवल्या जातात. पारंपरिक ब्लॅक फॉरेस्ट केक बनवताना चेरी ब्रँडीचा वापर आवश्यक मानला जातो. त्यामुळे जिभेवर गोडसर चव आणि मनावर हलकीशी झिंग येते.
जर्मनीतील बॅडन भागातील पेस्ट्री शेफ जोसफ केलर यांनी १९१५ मध्ये एका कॅफेमध्ये चॉकलेट केक चेरीज आणि व्हीप्ड क्रीम वापरून एक आगळ्यावेगळ्या प्रकारचे डेझर्ट बनवले. ते डेझर्ट अल्पावधीतच जर्मनीभर लोकप्रिय झाले. हळूहळू त्याची ख्याती युरोपभर पसरली व लोक घरोघरी हे डेझर्ट बनवू लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर या केकने देशांच्या सीमा ओलांडल्या आणि जगभरातील लोकांवर गोडसर मोहिनी घातली. त्यानंतर शेफ जोसफ केलर हे 'ब्लॅक फॉरेस्ट केकचे जनक' म्हणून प्रसिद्ध झाले.
Russian Salad: मॉस्कोच्या हॉटेलमधून जगभर!शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही रूपांत लाजवाब ‘रशियन सॅलड’ची गोड कहाणी नक्की वाचाब्लॅक फॉरेस्ट केक फक्त गोड चवीसाठीच नव्हे, तर आकर्षक सजावटीमुळेही विशेष मानला जातो. मऊसर चॉकलेटचे थर, वर पांढरे शुभ्र क्रीम, त्यात लपलेल्या चेरीज आणि त्यावरचे किसलेले चॉकलेट असे त्या केकचे रूप पाहिले, की पहिल्याच नजरेत आपण त्याच्या प्रेमात पाडतो. किसलेले किंवा कर्ल्ससारखे वळवलेले डार्क चॉकलेट त्या केकला जंगलासारखे रूप देतात असे म्हटले जाते.
आज ही केक म्हणजे फक्त डेझर्ट नाही, तर वाढदिवस लग्नाचा सोहळा किंवा खास प्रसंगाची शान बनली आहे. जर्मनी व युरोपमध्ये कॉफी आणि केक परंपरा आहे व तिथे ब्लॅक फॉरेस्ट हा कॉफीसोबत खाल्ला जाणारा आवडता केक आहे. ही केक खाताना चॉकलेटची समृद्धी, चेरीची चव आणि क्रीमची मऊसर गोडी मिसळून प्रत्येक घासाला खास चव आणि अनुभव मिळतो. हे डेझर्ट म्हणजे जर्मन बेकिंग परंपरेचे एक प्रतीक असून, ती जर्मनीकडून जगाला मिळालेली गोड भेट आहे. २००६ मध्ये जर्मनीत जगातील सर्वांत मोठा म्हणजे तब्बल ३,००० किलो वजनाचा ब्लॅक फॉरेस्ट केक बनवला गेला व त्याची नोंद गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये केली गेली.