Dhurandhar 2 Vivek Sinha Reacts On Getting Hate: आदित्य धरचा (Aditya Dhar) आगामी सिनेमा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) रिलीज होण्यासाठी आता फक्त दोनच दिवस उरलेत. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि सारा अर्जुन (Sara Arjun) यांची भूमिका असलेल्या धमाकेदार सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानं YouTube आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड धुमाकूळ घातलाय. 'धुरंधर 2' वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे ट्रेलरही अनेक भाषांमध्ये रिलीज करण्यात आलाय. अशातच आता अनेक प्रेक्षक सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. एकीकडे सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय, तर दुसरीकडे सिनेमातल्या अभिनेत्यांना धमक्या मिळत असल्याचं समोर आलं आहे. 'धुरंधर 2'मध्ये झळकलेल्या अभिनेत्यानं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भात खुलासा केला आहे. अभिनेत्याना त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा केला आहे.
'धुरंधर 2' सिनेमात 'झहूर मिस्त्री' नावाच्या दहशतवाद्याच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता विवेक सिन्हानं सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याला धमक्या येत असल्याची माहिती दिली. नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे विवेक सिन्हानं खुलासा केलाय की, काही लोकांनी त्याला खऱ्या आयुष्यातील दहशतवादी समजण्याची चूक केली आहे आणि या भूमिकेमुळे त्याला सतत धमक्या मिळत आहेत.
आदित्य धर दिग्दर्शित ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर'मध्ये विवेक सिन्हानं झहूर मिस्त्री या दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे. पण, काही लोकांना त्यानं साकारलेली भूमिका खरी वाटलीय. विवेक सिन्हानं अलिकडेच आपल्या सोशल मीडिया खात्यांवर अनेक पोस्ट्स शेअर केल्यात, ज्यामध्ये त्यानं स्पष्ट केलंय की, या भूमिकेमुळे लोकांनी त्यालाच खरा दहशतवादी म्हटलं आहे. अभिनेत्यानं पोस्टमध्ये नमूद केलंय की, 'धुरंधर 2'च्या ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे की, "हिंदू वाकई डरपोक कौम है..." याच डायलॉगमुळे अभिनेत्याला टीकेचा आणि धमक्यांचा सामना करावा लागतोय.
आपल्या अभिनयावर आणि आपण साकारलेल्या पात्रावर लोक ज्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत, त्याबद्दल आपल्याला समाधान वाटत असल्याचंही अभिनेत्यानं म्हटलंय. दरम्यान, अभिनेत्यानं या संधीचा फायदा घेत हे देखील स्पष्ट केलंय की, वास्तवात तो एक भारतीय आहे, पाकिस्तानी नाही.
अभिनेता विवेक सिन्हानं नुकताच एक फोटो शेअर केलाय आणि त्यासोबतच एक कॅप्शनही लिहिलंय. "माझं नाव विवेक सिन्हा आहे आणि मी दहशतवादी नाही...", अशा कॅप्शनसह अभिनेत्यानं एक पोस्ट शेअर केलीय. अभिनेत्यानं एक व्हिडीओही शेअर केलाय, ज्याला त्यांनं "मी पाकिस्तानी नाही...", असं कॅप्शनही दिलंय.
या व्हिडीओमध्ये विवेक सिन्हा म्हणालाय की, "काल मी एक व्हिडीओ अपलोड केला होता, ज्यामध्ये मी 'धुरंधर' या सिनेमातला एक डायलॉग बोलून दाखवला होता. "हिंदू वाकई डरपोक कौम है... पड़ोस में रहते हैं, जो उखाड़ना है उखाड़ लो।", असा तो डायलॉग. पण, या डायलॉगनंतर एवढा संताप सहन करावा लागतोय की, विचारू नका. कितीतरी कमेंट्स येतायत. जवळपास प्रत्येक कमेंटमध्ये लोक लिहितायत की, तुझं थोबाडंच दहशतवाद्यासारखं दिसतंय, स्क्रीनमध्ये घुसून मारू...
मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो की, मला मात्र या गोष्टीचं खरोखरंच खूप समाधान वाटलं. आपल्या सर्वांच्याच मनात वसलेल्या त्या देशभक्तीच्या भावनेला मी सलाम करतो. एका व्यक्तीनं तर मला 'मारण्यासाठी खास पाकिस्तानात येण्याची' धमकीही दिली होती. त्यामुळे, मित्रांनो, मी एक गोष्ट स्पष्ट करतो, मी पाकिस्तानातील नाही. मी मूळचा बिजनौरचा आहे आणि सध्या मुंबईत राहतो..."
नुकतंच, विवेक सिन्हा यानं फरीदून शहरयरच्या YouTube चॅनेलवर 'धुरंधर' (Dhurandhar) मधील त्याच्या पात्राविषयी भाष्य केलंय. अभिनेता म्हणाला की, "'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) चा ट्रेलर प्रत्यक्षात माझ्या पात्रापासूनच सुरू होतो, आणि याची मला मुळीच अपेक्षा नव्हती. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आदित्य सरांनी या पात्राविषयीची सविस्तर माहिती मला आधीच दिली होती; तसेच सेटवरील एकूण वातावरणही अत्यंत उत्तम होतं, ज्यामुळे पात्र साकारताना मला काहीच . माझ्या कामाला खरोखरच जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. असं काही घडेल, याची मी कधीच कल्पना केली नव्हती. अनेक लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर चक्क असंही म्हटलंय की, "तुम्ही तर खरेच दहशतवादी आहात..." माझ्यासाठी, ही एक प्रकारची Compliment आहे. त्या पात्राबद्दल लोकांच्या मनात किती तीव्र संताप आहे, हे पाहून मला खूप समाधान वाटतं."