अकोला: महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सोमवारी (ता.१३) पार पडलेली सभा गदारोळ, आरोप-प्रत्यारोप आणि शिवीगाळीमुळे चांगलीच वादग्रस्त ठरली. सभेच्या सुरुवातीलाच स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदेसेनेचे नगरसेवक तथा गटनेते सागर भारुका यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला. मानधन तत्वावरील १०१ कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या विषयावरून हा वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे सभागृहातील वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण बनले होते.
स्थायी समितीची सभा सुरू होताच नगरसचिव अमोल डोईफोडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त मंजुरीसाठी सभागृहाच्या पटलावर मांडले. साधारणपणे हा विषय औपचारिक स्वरूपाचा असतो. मात्र, याच विषयावरून वादाची ठिणगी पडली. नगरसेवक सागर भारुका यांनी मागील सभेतील इतिवृत्ताला विरोध दर्शविला. त्यांनी सांगितले की, आपण मागील सभेला उपस्थित नव्हतो. त्या सभेत मानधन तत्वावरील १०१ कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयाला आपला विरोध असल्याची नोंद सभागृहाच्या इतिवृत्तात घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सागर भारुका यांच्या मागणीवर सभापती विजय अग्रवाल यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, मागील सभेत मंजूर झालेल्या विषयांवर नंतर विरोधाची नोंद घेण्याचा कोणताही नियम नाही.
आधीच मंजूर झालेला विषय पुन्हा नामंजूर कसा होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी विजय अग्रवाल यांनी ‘सभागृह कोणाच्या मालकीचे आहे का?’, असा सवाल करत सागर भारुका यांच्या मागणीला विरोध दर्शविला. तसेच अधिकाऱ्यांना कोणतीही नोंद रेकॉर्डवर घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले. यानंतर दोघेही आक्रमक झाले व एकमेकांना शिवीगाळ झाल्याने सभागृहातील वातावरण तणावाचे झाले होते.
वाद वाढत गेल्यानंतर सभागृहात दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही वेळातच वातावरण तापले आणि दोघांनी एकमेकांवर शिवीगाळ केल्याचेही पाहायला मिळाले. परिस्थिती इतकी बिघडली की विजय अग्रवाल आणि सागर भारुका एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा व शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. भाजपचे नगरसेवक विनोद मापारी, काँग्रेसचे आझाद खान व इतर काही सदस्यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - १४ एप्रिल २०२६ निलंबनाचा आदेशवाद चिघळल्यानंतर सभापती विजय अग्रवाल यांनी सागर भारुका यांना सभेतून निलंबित करण्याचा आदेश दिला. सभागृहातील शिस्त राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. निलंबनाचा आदेश दिल्यानंतरही काही वेळ वातावरण तणावपूर्णच राहिले. सागर भारुका यांनी सभापतींच्या निर्णयावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर नगरसेवक पवन महल्ले यांनी सभागृहात प्रवेश करून सागर भारुका यांना सभागृहाबाहेर समजूत काढत नेले. यामुळे काही प्रमाणात वातावरण शांत झाले.
इतर विषयांना मंजूरीमनपाच्या शाळांमध्ये डिजिटल स्मार्ट बोर्ड खरेदीसाठी निविदाधारकाशी करार करण्यास मंजुरी देण्यात आली. यासोबतच, ६५ सेवा ऑनलाईन करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत काम राबविण्यास व संबंधित निविदाधारकाशी करार करण्यासही हिरवा कंदील देण्यात आला.